बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्या त्या निरागस हसण्यावर
आमचे हसणे आहे
तर तुझ्या गप्प बसण्यावर
आमचे रुसणे आहे
बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्या ओठी शब्द नसताना
तुझे संवाद आहेत
तर तुझ्याशी गप्पा
म्हणजे निर्विवाद आहे
बरं झालं अनु तू लहानगी आहेस
कोणी असो वा नसो
तुझे एकांतात खेळणे आहे
तुला त्या खेळी बघण्यात
दमलेले मन मग्न आहे
बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्यासंगे नाते म्हणजे
एक खरे स्वप्न आहे
कारण अपेक्षित प्रेम
या नात्यातच आहे
बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्या असण्यात किंवा नसण्यात
आयुष्यात खूप मोठा फरक आहे
कारण तुझे ते लडिवाळ हसणे
आयुष्य जगण्यासाठी असणे आहे
©ओंकार शिंदे
७ डिसेंबर २०१४

No comments:
Post a Comment