काॅलेजचा कट्टा दिसला
हळूच म्हणाला
माझ्यावर का रूसलास?
कामासाठी जाता जाता,
पाय आपसुक वळले
काय कुणास ठाऊक
सर्व आठवणींनी घेरले
तोच बोलला
दोन शब्द बोल माझ्याशी
अशु, कांचन, मयुरा
बोलतात का तुझ्याशी ?
खुप दिवस झाले
तुम्ही भेटला नाहीत
वाट बघतोय तुमची
पण कधी येऊन बोलला नाहीत
काय म्हणतोय संतोष
त्याच सुधारलं का वागणं
का अजुन चाललय
एकीला सोडून दुसरीच्या मागे धावणं
भेटते का अशु
जी तुम्हाला समजवायची
स्वतःच्या हाताने
दोन प्रेमाचे घास भरवायची
कशी आहे ती वर्षा
अजुन तशीच पडते
अजूनही बोलण्यापुर्वी
एकटीच हसते
मयुराला अजुन
तू आणि संतोष घाबरता का?
तीच्या त्या स्पष्ट बोलण्यामुळे
अजुन तुम्ही बावरता का?
काय कुठे आहे ती कांचन
जी हसायची
मराठी बोलताना
त प प प करायची
अचानक मनाला वाटलं
तुझं तर सगळं लक्षात आहे
आम्हीच गेलोय दूर
तु अजून तिकडेच आहेस
काय सांगू तुला
काय काय चाललय,
कामात आहेत सगळे,
भेटणं फक्त मोबाईलवरच चाललय
वेळ नाही स्वतःसाठी
कामात सगळे अडकलेत
तुला भेटण्यासाठी
सर्व खुप आसुसलेत
तो कट्टा माझ्याकडे बघुन
मिस्कीलपणे हसला
खोटं नको बोलू माझ्याशी
तुम्ही सगळे माझ्यावर रूसला...
तुम्ही सगळे माझ्यावर रूसला......
© ओंकार शिंदे
१६ जुलै २०१४
